शेगाव : जत तालुक्यातील वाळेखिंडी गावालगत बुरुंगलेवाडी-जाधववाडी रस्त्यालगतच्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देण्यात युवक व वनविभागाला यश आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. दोन ते अडीच वर्षाच्या नर जातीच्या कोल्ह्याला उपचार करून वन अधिकाऱ्यांनी जंगलात सोडले.दुपारी बारा वाजण्याच्यासुमारास माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांचा मुलगा अजित शिंदे याला संभाजी जाधव यांच्या मालकीच्या विहिरीत पडलेला कोल्हा दिसला. ही विहीर सुमारे ८० फूट खोल असल्याने अजित याने जाधव यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर संभाजी जाधव घटनास्थळी आले.
त्यांनी नवाळवाडीचे पोलीस पाटील व वनसंरक्षक समितीचे अध्यक्ष अविनाश सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला. सूर्यवंशी यांनी नवाळवाडीतील काही युवकांना बोलावून घेतले. यावेळी अजित शिंदे हा युवक विहिरीत उतरला.
त्याला बाळासाहेब सूर्यवंशी, बालाजी चव्हाण, माजी सैनिक शीतल बिडवे, संभाजी शिंदे यांनी सहकार्य केले. त्यानंतर दीड तासाच्या कालावधीनंतर कोल्ह्याला बाहेर काढण्यात यश आले. त्यावेळी कोल्ह्याच्या पायाला जखम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जत येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली.वनविभागाचे अधिकारी ए. एस. साठे, एम. एस. मुसळे, एस. एस. मुजावर तात्काळ घटनास्थळी पिंजरा व इतर साहित्यासह दाखल झाले. त्यांनी जत येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कोल्ह्याला दाखल केले. तेथे डॉ. गायकवाड यांनी उपचार केले. त्यानंतर कोल्ह्याला जंगलात सोडण्यात आले.