फोटो - २९०७२०२१-विटा-सागर पाटोळे, २९०७२०२१-विटा-भगवान चव्हाण, २९०७२०२१-विटा-संजय आडके, २९०७२०२१-विटा-संतोष चव्हाण, २९०७२०२१-विटा-राजेंद्र चव्हाण.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : जनावरांच्या गोठ्यातून सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सहा एच. एफ. जातीच्या जर्शी गायी लंपास करणाऱ्या पाच जणांच्या सराईत चोरट्यांना विटा पोलिसांनी बुधवारी गजाआड केले. या चोरट्यांकडून चोरीसाठी वापरलेला टेम्पो व सहा जर्शी गायींसह ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सागर जालिंदर पाटोळे (वय ३०, रा. वेजेगाव, ता. खानापूर), भगवान ज्ञानदेव चव्हाण (६०, रा. हातीत, ता. सांगोला), संतोष छगन चव्हाण (२५), संजय माणिक आडके (३५) व राजेंद्र छगन चव्हाण (४०, तिघेही रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
वेजेगाव (ता. खानापूर) येथील शेतकरी राजेंद्र दत्तात्रय लोहार यांच्या पांगरवाडा शेतातील गोठ्यातून संशयितांनी दोन, तर तुपेवाडी येथील गोठ्यातून एक अशा तीन जर्शी गायी २१ जुलै रोजी मध्यरात्री चोरी केल्या होत्या. याची विटा पोलिसांत नोंद होती. या गायी विक्रीसाठी एका टेम्पोतून घेऊन जाणार असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस नाईक अमरसिंह सूर्यवंशी यांनी मायणी रस्त्यावरील पवईटेक येथे सापळा लावला. गायी असलेल्या टेम्पोसह पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणातील संशयित सागर पाटोळे हा सराईत चोरटा असल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सातारा जिल्ह्यातील वडूज व दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी तीन गायींची चोरी केल्याची कबुली दिली. त्यावेळी पोलिसांनी चोरीला गेलेल्या सर्व ६ जर्शी गायी व टेम्पो असा ३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विटा पोलीस ठाण्याचे नाईक राजेंद्र भिंगारदेवे, हणमंत लोहार, अमरसिंह सूर्यवंशी, शशिकांत माळी, सुरेश भोसले, सोमनाथ कोळी, रोहित पाटील, कॅप्टन गुंडावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.