इस्लामपूर : शहर व परिसरात दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. या चोरट्यांकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या चोरट्यांकडून चोरीचे अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
केतन सुरेश पाटील (वय २१, रा. वाळवा) आणि राजेंद्र जालिंदर पाटील (२८, रा. पोखर्णी, ता. वाळवा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. दोघांना शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दुचाकीच्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी अशा चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकटीकरण शाखेचे पथक या चोरट्यांच्या मागावर होते. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांचे पथक गस्तीवर असताना हे दोघे चोरटे बसस्थानक परिसरात संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने या दोघांना सापळा रचून अटक केली.
या कारवाईत हवालदार सोमनाथ पाटील, गणेश शेळके, गणेश मोहिते, अमोल चव्हाण, उत्तम माळी, संदीप पाटील, सूरज जगदाळे, योगेश जाधव, आलमगीर लतीफ, उमेश शेटे, जयराम चव्हाण यांनी भाग घेतला.
फोटो- ०४१२२०२०-आयएसएलएम- इस्लामपूर क्राईम न्यूज
इस्लामपूर येथे अटक केलेल्या दुचाकी चोरट्यांसमवेत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे व कर्मचारी.