सुभाषनगर-तासगाव रस्त्यावर मदिना मस्जिद परिसरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी पाच ठिकाणी बंद घरे, बंगले व एक किराणा दुकान फोडून चार लाखांचा ऐवज लुटला. रविवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर खळबळ उडाली.
चोरट्यांनी निवृत्त सुभेदार खुदबुद्दीन उमराणीकर यांच्या बंद घराचे कुलूप कटावणीने उचकटून घरातील लोखंडी कपाटातील सात तोळे सोन्याचे दागिने, १५० ग्रॅम चांदीचे दागिने, २० हजार रुपये रोख, असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. तेथून जवळ असलेल्या द्राक्ष व्यापारी सोहेल सय्यद यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून ४० हजार रोख रक्कम चोरली. आयुब जमादार यांचे अरबाझ किराणा स्टोअर्स फोडून दोन हजार रोख रक्कम व दुकानातील साहित्य असा पाच हजारांचा ऐवज चोरला. कामानिमित्त आखाती देशात असलेले सादिक धत्तुरे यांचा बंद बंगला फोडून आतील साहित्य विस्कटले. मात्र येथे चोरट्यांना माैल्यवान ऐवज सापडला नाही. तेथून काही अंतरावर असिफ शेख यांचा बंगला फोडून २० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. बंडू बारटक्के यांचे घर फोडून घरातील पूजेची चांदीची थाळी, देवाच्या मूर्ती चोरून नेल्या. चोरीबाबत खुदबुद्दीन उमराणीकर यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
नवीन वर्षात चोरट्यांनी आव्हान दिल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रशिक्षणार्थी अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्यासह पोलीस फाैजफाटा घटनास्थळी दाखल झाला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने सुभाषनगर चाैकापर्यंत चोरट्यांचा माग काढला. तेथून चोरटे वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. या परिसरातील सीसीटीव्हीतही चोरट्यांचे चित्रण पोलिसांना मिळाले नाही. पाळत ठेवून बंद घरे फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे हे कृत्य असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फाेटाे : ०३ मिरज ४..५
ओळ : सुभाषनगर (ता. मिरज) येथील खुदबुद्दीन उमराणीकर यांच्या घरातील साहित्य चाेरट्यांनी विस्कटले हाेते.