सांगली- कर्मवीर चौकातील दादूकाका भिडे बालसुधारगृहातून पाच अल्पवयीन गुन्हेगारांनी खिडकीचा गज कापून पलायन केले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पाचही गुन्हेगार सांगलीतील आहेत. त्यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले. पण ते घरीही गेले नसल्याची माहिती मिळाली आहे.
खून, चोरी, मारामारी व मुलीची छेडछाड प्रकरणातील सहा अल्पवयीन गुन्हेगार बालसुधारगृहात आहेत. यातील एक गुन्हेगार शिराळ्यातील आहे, तर अन्य पाचजण सांगलीतील आहेत. त्यांना बालसुधारगृहातील स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले होते. शुक्रवारी रात्री आठ वाजता या सर्वांना जेवण देण्यात आले. दहा वाजता बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी राऊंड मारुन आढावा घेतला. त्यावेळी हे सहाजण झोपी गेल्याचे आढळून आले. मध्यरात्री पाचजणांनी करवतीने खिडकीचा गज कापून पलायन केले. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विश्रामबाग पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. कापलेले खिडकीचे गज सापडले आहेत. ते पळून गेल्याची नोंद विश्रामबाग ठाण्यात करण्यात आली आहे.
दोन दिवसापूर्वी सांगलीत गजानन किसन सुर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या प्रवाशाचे अपहरण करुन सांगलीवाडीत खून केला होता. याप्रकरणी रिक्षाचालक नितीन जाधव, त्याचा मुलगा व अमृत पाटील या तिघांना अटक केली आहे. नितीनचा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची शुक्रवारी दुपारी बालसुधारगृहात रवानगी केली होती. बालसुधारगृहात चार अल्पवयीन गुन्हेगार त्याचे मित्र होते. त्यामुळे त्यांनी पळून जाण्याचा बेत आखला असण्याची शक्यता आहे. नितीन जाधवच्या मुलाला त्याचे मित्र भेटण्यास आले होते. त्यांनी खिडकीचे गज कापण्यासाठी करवत दिला असण्याची शक्यता आहे. त्याद्दष्टिने पोलिसांचा तपास सुरु आहे. ते घरी गेले असतील, अशी शक्यता धरुन पोलिसांनी घरावरही छापे टाकले. पण त्यांचा सुगावा लागला नाही.
जिवे मारण्याची धमकीपाचही गुन्हेगारांनी शिराळ्यातील अल्पवयीन गुन्हेगारासमोर खिडकीचा गज कापण्यास सुरुवात केली. त्याने विरोध करताच त्यांनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याला चादर डोळ्यावर घेऊन झोपण्यास सांगितले. त्यामुळे तोही भितीने झोपी गेला. शनिवारी सकाळी त्याने घडलेला प्रकार कर्मचाºयांना सांगितला. हा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी तातडीने ही खिडकी सिमेट-विटाने लिपून घेण्यात आली.