अविनाश बाड ।आटपाडी : आटपाडी तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून दोन महिने होत आले, तरीही शासनाने छावणीचालकांना अद्याप एक रुपयाचेही बिल दिलेले नाही. आतापर्यंत पाच कोटींहून अधिक बिल येणेबाकी आहे. बिले न मिळाल्याने अनेक छावणीचालक मेटाकुटीला आले आहेत. जनावरांची वेगवेगळ्या कारणांनी हेळसांड करू लागले आहेत. शेतकऱ्यांना मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
गेल्यावर्षी पाऊन न झाल्याने जनावरांसाठी चाºयाची मोठी टंचाई निर्माण झाली. नोव्हेंबरपासूनच छावण्या सुरू करण्याची गरज होती; पण लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीकडे सर्वांचेच लक्ष असल्याने तालुक्यात छावण्या सुरू व्हायला खूप वेळ लागला. त्यामुळे मोठ्या संख्येने पशुधन मिळेल त्या भावाने शेतकºयांनी विकून टाकले.
आटपाडी तालुक्यात दि. २६ एप्रिल रोजी तडवळे येथे प्रथम छावणी सुरू करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत तालुक्यात एकूण २७ छावण्या सुरू करण्यात आल्या. सध्या ५२३९ शेतकºयांची १६२९६ मोठी, तर २६१६ छोटी अशी एकूण १८९१२ जनावरे छावण्यांमध्ये दाखल झाली आहेत. मोठ्या जनावराला दररोज १०० रुपये, तर छोट्या जनावराला दररोज ५० रुपये देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मोठ्या जनावराला दररोज १८ किलो हिरवा चारा, एक किलो पशुखाद्य आणि दोन दिवसातून एकदा ५०० ग्रॅम क्षारमिश्रण देणे बंधनकारक आहे. लहान जनावरांसाठी दररोज ९ किलो हिरवा चारा, ५०० ग्रॅम पशुखाद्य आणि दोन दिवसातून एकदा २५० ग्रॅम क्षारमिश्रण देणे बंधनकारक आहे.
प्रत्यक्षात हिरवा चारा म्हणजे दररोज ऊस देण्यात येतो. छावणीचालकांना ऊस ३ हजार ते ३१०० रुपये टन या दराने मिळतो, तर मका हिरवा चारा घ्यायचा असेल, तर तो ५ हजार रुपये टन मिळतो. त्यामुळे मका परवडत नाही, असे छावणीचालकांचे म्हणणे आहे. ऊस काही जनावरांचे खाद्य नाही; पण नाईलाजाने शेतकरी उसाचे बारीक तुकडे करून जनावरांपुढे ठेवत आहेत. उपाशी जनावरे ते खात आहेत. काही शेतकरी पदरमोड करून चारा विकत आणून उसासोबत खायला घालून जनावरे जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पशुखाद्याच्याबाबतीत अनेक छावण्यांमध्ये तक्रारी आहेत.
अत्यंत निकृष्ट दर्जाची पेंड जिला जनावरे तोंडही लावत नाहीत, अशी पेंड अनेक छावण्यात देण्यात येत आहे. पण छावण्यात जनावरांना पाणी तरी मिळतेय. त्यामुळे जनावरे कशी-बशी जगत आहेत. जनावरांना वेगवेगळा हिरवा चारा देण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.छावणीचालकांची लूट!छावणी मंजूर करण्याच्या प्रक्रियेत अकारण काही अधिकाºयांनी ५ ते १० हजारांपासून २५ हजारांपर्यंत हात धुऊन घेतल्याचा आरोप होत आहे. सध्या दररोज १७ लाख ६० हजार ४०० रुपये छावणीचालकांचा खर्च होत आहे. पाच लाख खर्च करणे अपेक्षित असताना, २५-३० लाख बिले येणे बाकी आहेत. टक्केवारीसाठीच छावणीचालकांची अडवणूक सुरू असल्याचा आरोप छावणीचालक करीत आहेत.