इस्लामपूर : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ५ ते ९ मे या कालावधीत पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. कर्फ्यू लावण्यापूर्वी नागरिकांना मंगळवारचा दिवस जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी देण्यात आला आहे.
येथील पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, मुख्याधिकारी अरविंद माळी, गटनेते विक्रम पाटील, संजय कोरे यांची बैठक झाली.
शहरातील तीनशेवर कोरोनाची रुग्णसंख्या आणि वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लावण्याची मागणी विविध संघटना आणि सामाजिक संस्थांनी केली होती.
त्यानुसार, रविवारी झालेल्या पालिकेच्या विशेष ऑनलाइन सभेत मंगळवारपासून जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय झाला होता. मात्र, नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी मंगळवारचा दिवस पूर्वतयारीसाठी देण्याची सूचना सबनीस यांनी केल्यावर त्याला सर्वांनी मान्यता दिली.
चौकट
शहराच्या सर्व सीमा सील
या पाच दिवसांच्या काळात शहरातील औषध दुकाने आणि आरोग्य व्यवस्था कोरोना नियमावलीचे पालन करून सुरू राहील. तसेच दूध डेअरी आणि संकलन, घरपोच विक्री हे सकाळी १० पर्यंत सुरू राहील. या पाच दिवसांच्या काळात शहराच्या सर्व सीमा सील करण्यात येतील. नागरिकांच्या हालचालीवर मर्यादा आणण्यासाठी बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडता सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.