सांगली : एसटी महामंडळाच्या दहा आगारातील रोजंदारीवर काम करणाऱ्या २५० कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीच्या नोटिसा दिल्या होत्या. तरीही कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे शुक्रवारी जत आगारातील पाच कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई विभाग नियंत्रकांनी केली आहे. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसून आला.
एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी दि. २८ ऑक्टोबरपासून राज्यातील विविध आगारांत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या संपाला सर्व आगारातून पाठिंबा मिळत आहे. संपात सहभागी झाल्याबद्दल एसटीच्या सांगली विभागातील दहा आगारातील आजपर्यंत २४९ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. संपात सहभागी झालेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीवरील २५० कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर हजर राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुदतीत कामावर हजर न झाल्यास त्यांची सेवासमाप्ती केली जाईल, असा इशारा दिला होता. शुक्रवारी २५० कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी कामावर हजर झाले नाही. शेवटी जत आगारातील पाच कर्मचाऱ्यांवर विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी शुक्रवारी सेवासमाप्तीची कारवाई केली आहे. उर्वरित २४५ कर्मचारी शनिवारपर्यंत कामावर हजर झाले नाही तर त्यांच्यावरही सेवासमाप्तीची कारवाई होणार आहे, असेही भोकरे यांनी सांगितले.
कर्मचारी आंदोलनावर ठाम
कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन शुक्रवारीही सांगलीत चालूच होते. प्रशासनाने कितीही टोकाची कारवाई केली, तरीही आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार आहे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलनामध्ये महिलांची संख्याही मोठी आहे. आंदोलनास बसलेल्यांपैकी काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, तरीही ते आंदोलनात सहभागी झाले होते.