अशुतोष कस्तुरे ।पलूस : पलूस तालुक्याला जलप्रलयाने वेढले असताना, दुधोंडी (ता. पलूस) येथील अवघे ५५ वर्षाचे ‘तरुण’ रामदास उमाजी मदने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले. स्वत:चे घर पाण्यात बुडाले असताना, कसलीही तमा न बाळगता त्यांनी केवळ काहिलीतून ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविले. सहा दिवसात ‘वन मॅन आर्मी’ बनून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावलेले मदने पूरग्रस्तांसाठी देवदूत बनून राहिले. या मदतीवर जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल, अशा प्रतिक्रिया त्यांनी वाचविलेल्या पूरग्रस्तांमधून व्यक्त होत आहे.
कोणी तरी चांगले म्हणावे किंवा काही फायदा व्हावा, अशी कोणतीच अपेक्षा न ठेवता मदनेगावातील पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम अविरतपणे करत होते. अंगावर लाईफ जॅकेटच काय, तर साधा रेनकोटही नाही. सहा दिवसात पाचशेहून अधिक ग्रामस्थांची सुटका केली. अनेकजण बाहेर पडण्यास धजावत नव्हते. पण त्यांना प्रेमाने समजावून, पुराचा धोका पटवून देऊन घरातून बाहेर काढले.
दुधोंडीपासून (ता. पलूस) पश्चिमेकडील तीन किलोमीटरवरील माळी वस्ती, सती आई मंदिर परिसर व जुने घोगाव अशा भागातील पूरबाधित ग्रामस्थांना छोट्याशा काहिलीतून सतत सहा दिवस ते मदत करीत होते. या सहा दिवसात त्यांनी या परिसरात तीनशेहून अधिक फेºया केल्या. पुरामध्ये अडकलेल्यांसाठी ते देवदूत ठरले. खरे तर महापुराने त्यांच्या स्वत:च्या घरात चार फूट पाणी शिरले आहे. असे असताना आपले कुटुंब इतरत्र हलविल्यानंतर, गावही वाचले पाहिजे, या भावनेतून त्यांनी अहोरात्र मदत केली. रात्रीच्या वेळी ते पुराच्या पाण्यात बुडालेल्या घराच्या कोलांवर झोपत होते. त्यांचा पुतण्या विजय मदने त्यांच्यापर्यंत अन्न-पाणी पोहोचवत होता.
नि:स्वार्थीपणे मदत करणारे समाजात फार थोडे आहेत. त्यात रामदास मदने आहेत. गेल्या सहा दिवसात त्यांनी अनेकांना पुरातून सुरक्षित बाहेर काढून प्रशासनाची मदत केली आहे.- एम. एस. काळगावे, सहायक पोलीस निरीक्षक, कुंडल पोलीस ठाणे