सांगली : शहरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर कुपवाड फाटा, वानलेसवाडी, शिंदेमळा, टिंबर एरिया परिसरातील पावसाळी वाहिन्या, नाले तुंबून पाचशे ते सहाशे घरांमध्ये पाणी शिरले. तर भीमनगरमधील १५० जणांना स्थलांतर करण्यात आले. रात्रीच्या सुमारास घरात पाणी आल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पावसाळी वाहिन्या, नाल्यांवरील अतिक्रमणे, नाल्यांची सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. नागरिकांनी गणेश मंदिराची भिंत फोडून पाण्याला वाट करून दिली. बुधवारीही शहरात पाऊसाने जोरदर हजेरी लावली असल्याने अद्याप काही भागात पाणी असल्याचे चित्र आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून शहराच्या उपनगरांमध्ये ठिकठिकाणी पावसाळी वाहिन्या, नाले तुंबण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शहरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्यानंतर कुपवाड फाटा येथील चैत्रबन नाला तुडुंब भरून वाहू लागला. या नाल्यावरील चैत्रबन सोसायटी, मंगलमूर्ती कॉलनी, तुळजाईनगर, आनंदनगर, जिल्हा परिषद कॉलनी या परिसरातील शेकडो घरांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. नागरिकांनी गणेश मंदिराची भिंत फोडून पाण्याला वाट करून दिली. अन्यथा आणखी काही घरे पाण्याखाली गेली असती.
या नाल्यावरील पोलीस लाईनच्या परिसरातही पाणी शिरले होते. वानलेसवाडी परिसरात हायस्कूल रोड, श्रीरामनगरमधील गल्ली क्रमांक ११ ते २० पर्यंतच्या सर्व रस्त्यांवरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता. उत्तर-दक्षिण वाहणा-या नाल्यामध्ये जागोजागी प्लास्टिक कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे परिसरातील २० ते २५ घरांमध्ये पाणी शिरले होते. सकाळी सहा वाजता गुडघाभर पाणी होते. त्यातूनच नागरिक ये-जा करत होते. महापालिका यंत्रणेकडून पाण्याचा निचरा करण्याचे काम सकाळपासूनच सुरू होते.
सांगली : जिल्ह्यात गतवर्षी सरासरी ४१८.७ मिलिमीटर, तर यावर्षीच्या पावसाळ्यात विक्रमी ८२०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यातही हजेरी लावली आहे.
- अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता, मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधित मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊवेळा जून कोरडा गेल्याने शेतकºयांवर अरिष्ट कोसळले. या पार्श्वभूमीवर यंदा जुलैच्या दुस-या आठवड्यात झालेले मान्सूनचे आगमन उशिराच गणले जाते.
- जुलैच्या दुस-या आठवड्यापासून आगमन झालेल्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडवला होता. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापूर आला. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव या दुष्काळी तालुक्यात मात्र पावसाचा जोर फारसा नव्हता. यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाच तालुक्यात ओला दुष्काळ, तर पूर्वेच्या पाच तालुक्यात कोरडा दुष्काळ होता. मात्र सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात दुष्काळी भागातही परतीच्या मान्सूनने दमदार हजेरी लावली. अग्रणी नदीला चाळीस वर्षांत प्रथमच पूर आल्याचा अनुभव तासगाव, आटपाडी तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी घेतला.
- जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात सरासरी ४१८.४ मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. गेल्यावर्षी दि. १ जून ते १९ आॅक्टोबर २०१८ या कालावधित ४१८.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तो ८७.७ टक्के होता. दुष्काळी तालुक्यामध्ये १०० मिलिमीटरचा आकडाही पावसाने पार केला नव्हता. गेल्यावर्षी पावणेदोनशे टँकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा करावा लागला होता. चारा छावण्या उघडण्याची वेळ सरकारवर आली होती. यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाला; पण, दहा वर्षांचा विक्रम माडून गेला.