रेठरे धरण : कोल्हापूरहून कराडच्या दिशेने निघालेल्या ट्रक (क्रमांक केए २२ डी १६९८) चालकाने दारूच्या नशेत ट्रक चालवीत मालवाहू मोटार, दुचाकीस्वार व चायनीज गाड्यांना धडक देऊन चार ते पाच लोकांना उडविले. यामध्ये ट्रकचालकासहित पाच जण जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, सदर मालवाहू मोकळा ट्रक वाघवाडीकडून पेठ येथील सेवा रस्त्यावर वेगात आला. तेव्हा ट्रकच्यापुढे इंजिन पार्ट घेऊन निघालेल्या मोटारीला ट्रकने जोरात धडक दिली व तो तसाच वेगात फुटपाथवर उड्डाणपुलाच्या भिंतीला घासत गेला. फुटपाथवर असणाऱ्या चायनीज गाड्यांना त्याने दाबत नेले. तेव्हा तेथे असणारे मुबारक जमादार (वय ४८) व नोमान जमादार (२०) या अपघातात जखमी झाले. तसेच मोटारीला धडक देण्यापूर्वी ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिली. यामध्ये ईश्वर बाळासो नायकल (वय ३३) व त्यांच्या पत्नी सोनाल ईश्वर नायकल (वय ३०) हे पती व पत्नी नाल्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालक इम्तियाज मुजावर (वय ५०, रा. बेळगाव) यांच्या तोंडास तसेच पोटाला मार लागला आहे. दारू पिऊन नशेत गाडी चालविल्याने मोठा अपघात झाला.यावेळी जमलेल्या लोकांनी ट्रकचालकास बेदम मारहाण केली. श्री कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून धनराज तापोळे, मनोज पाटील यांनी जखमींना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
Sangli: मद्यपी ट्रकचालकाच्या धडकेत पाच जखमी, लोकांनी ट्रकचालकास केली बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:45 IST