रेठरे धरण तलावाजवळ शिराळ्याकडून येणाऱ्या उतारावर डाव्या बाजूला रस्त्याच्या कामासाठी दगडाचे मोठे ढीग टाकले आहेत. शनिवारी दुपारी झालेल्या जाेरदार पावसामुळे रस्ता निसरडा बनला हाेता. सायंकाळच्या सुमारास शिराळाकडून पेठच्या दिशेने निघालेली जीप अचानक रस्त्यावरील दगडाच्या ढिगाऱ्याला घासून गेल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. काही कळण्यापूर्वीच जीप सहा ते सात फूट हवेत उडून बाजूच्या चाळीस फूट खड्ड्यात कोसळली. रस्त्याच्या उजव्या बाजूला मातीची भर असल्याने जीपमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले. अपघातात जीपचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याच ठिकाणी रात्री साडेआठ वाजता दुचाकीवरुन (क्र. एमएच १४ सीबी ३३८८) दोन पुरुष व एक महिला असे तिघे शिराळाकडून पेठच्या दिशेने जात हाेते. अंधारात त्यांची दुचाकी थेट या ढिगाऱ्यावर आदळली. दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. ते रस्त्यावर पडले असतानाच अचानक मागून आलेली माेटार (क्र. एमएच १० डीजी ४९९७० वेगाने दगडाच्या ढिगाऱ्यावरून पुढे जाऊन दुचाकीस येऊन धडकली. इस्लामपूर पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी जखमींना रुग्णवाहिकेमधून इस्लामपूरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. अपघातात तिन्ही वाहनांचे मिळून सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.