इस्लामपूर : शहरातील कचेरी परिसरात ऑफसेट प्रिंटिंगचा व्यवसाय करणाऱ्या लघू उद्योजकाला नाशिक येथील व्यापाऱ्याने झेरॉक्स पेपर पुरविण्याचा बहाणा करून ५ लाख १९ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार वर्षभरापूर्वी घडला आहे. याबाबत गुरुवारी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अधिकराव आकाराम देशमुख (वय ३६, रा. बहे, ता. वाळवा) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार के.डी.आर. लिसा ग्लोबल नीड ट्रेडर्स कंपनीच्या राज दिनेश पंडित या नाशिकच्या व्यापाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिकराव देशमुख यांचा इस्लामपूर येथे ऑफसेट प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी त्यांनी झेरॉक्स पेपरची होलसेल विक्री सुरू करण्यासाठी राज पंडित याच्याशी १५ फेब्रुवारी २०२० रोजी संपर्क साधला होता. त्या वेळी तीन हजार रिम पेपर खरेदी करण्याबाबत त्यांचे बोलणे झाले. पंडित याने ३ लाख ७५ हजार रुपयांच्या एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम आगाऊ देण्यास सांगितले. त्यानुसार देशमुख यांनी स्वत:च्या आणि पत्नीच्या बॅँक खात्यावरून त्याला पैसे पाठविले.
मात्र मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने हा माल देशमुख यांना मिळू शकला नाही. जून महिन्यात लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा पंडित याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने ११ हजार पेपर रिम एकदम खरेदी कराव्या लागतील, त्यातील २५ टक्के रक्कम द्यावी लागेल, असे देशमुख यांना सांगितले. देशमुख यांनी पुन्हा पत्नी व स्वत:च्या खात्यावरून ५ लाख १९ हजार २०० रुपये पंडित याच्या खात्यावर पाठविले. त्यानंतर आजपर्यंत हा माल न मिळाल्याने देशमुख यांनी पोलिसात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक डी.पी. शेडगे अधिक तपास करीत आहेत.