आटपाडी : आटपाडी येथील विद्यानगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७० हजार रुपये रोख रकमेसह सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी गुणवंतराव विलासराव गायकवाड यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आटपाडी आगाराकडे गुणवंतराव गायकवाड हे चालक आहेत. त्यांचे मूळ गाव शेटफळे आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ते सध्या विद्यानगर येथे भाड्याच्या घरात राहतात. नोकरीशिवाय जोडधंदा म्हणून त्यांनी आटपाडी परिसरात सुका मेवा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ते सहकुटुंब शेटफळे येथे आई-वडिलांकडे गेले हाेते. रात्रभर तेथे राहून रविवारी सुटी असल्याने दिवसभर परिसरात सुका मेवा विक्री करीत सायंकाळी ते विद्यानगर येथे घरी आले. यावेळी घराचे कुलूप तुटलेले त्यांना दिसले. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, चार तोळे वजनाची सोन्याची साखळी, १५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, दहा भार वजनाचे चांदीचे दागिने, ७० हजार रुपये रोख आणि दहा किलो बदाम, दहा किलो काजू, एक किलो अंजीर, एक किलो अक्रोड असा सुका मेवाही लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.
चौकट
काजू-बदामावरही डल्ला!
घरात काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड असा २८ किलो सुका मेवा होता. चोरट्यांनी ताेही पळवून नेला.
गुणवंतराव यांच्या सख्ख्या मेहुण्याचे लग्न चार दिवसांपूर्वी झाले आहे. त्यामुळे सर्व दागिने घरात होते. शिवाय व्यापाऱ्यांचे पैसे भागविण्यासाठी त्यांनी घरात ७० हजार रुपये आणून ठेवले होते. या सर्व ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.