लोकमत न्यूज नेटवर्क
माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी शेतातील बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले रोख दोन लाख रुपये व चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने असा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला.
माडग्याळ - अंकलगी रस्त्यावर माडग्याळपासून दोन किलोमीटरवर कापड व्यापारी शिवानंद सिद्राम कोरे यांचे शेतात घर आहे. शुक्रवारी माडग्याळचा आठवडा बाजार असल्याने घरातील सर्वजण बाजारात गेले होते. घरात कोणीही नव्हते. नेमकी हीच संधी चोरट्यांनी साधली.
दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कोरे यांनी आतील कपाटामध्ये घराच्या बांधकामासाठी दोन लाख रुपये व अंबाबाई मंदिराचे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवले होते. चोरट्यांनी कपाट फोडून हा मुद्देमाल लंपास केला. दुपारी बाजार करून घरातील सर्वजण शेतातील घराकडे गेले, तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती उमदी पोलिसांना देण्यात आली. उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. सांगलीहून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान, गुरुवारी रात्री एक पाणाड्याचा मुक्काम कोरे यांच्या घरी होता. तो सकाळी उठून गावी गेला. मात्र, फोनवर बोलताना गडबडल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस कसून चौकशी करत आहेत.