सांगली : शहरातील पटेल चौक परिसरातील हार्डवेअर साहित्य विक्रेत्याला चार लाख ९० हजार ५८८ रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अलीअसगर आब्बासअली नयानी (रा. ख्वॉजा कॉलनी, सह्याद्रीनगर, सांगली) यांनी दीपककुमार गुप्ता (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) याच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी नयानी यांचे पटेल चौकात महाराष्ट्र हार्डवेअर नावाने दुकान आहे. मार्च महिन्यात संशयित तिथे आला व त्याने दुकानातून वेल्डींग मशिन, लिफ्टींग हुक, सेफ्टी बेल्ट, वेल्डींग सॉकेट असे चार लाख ९० हजार ५८८ रुपयांचा माल खरेदी केला. याच्या बदल्यात गुप्ता याने नयानी यांना अथणी (जि. बेळगाव) येथील एका बँकेचा धनादेश दिला होता. नयाणी यांनी दोनवेळा हा धनादेश टाकूनही तो वटला नाही.
यानंतर नयाणी यांनी गुप्ता यांच्याशी संपर्क साधत धनादेश न वटल्याने मालाचे पैसे देण्याची मागणी केली. मात्र, गुप्ता याने ते पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार प्रयत्न करूनही गुप्ता पैसे देत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुप्ता याच्याविरोधात आता फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.