सांगली : दुधाळ गायी देण्याच्या आमिषाने एकास चार लाख ८० हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तानाजी नारायण काळे (वय ४१, रा. खणभाग, शेवाळे गल्ली, सांगली) यांनी डॉ. अभिषेक जयंतीलाल परदेशी (रा. घोडेगाव, पुणे) याच्याविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी काळे यांची कसबे डिग्रज (ता. मिरज) आणि राजवाडा चौक परिसरात रोपवाटिका आहे. संशयित डॉ. परदेशी याने काळे यांच्याशी संपर्क साधत, चांगल्या प्रतीच्या स्ट्रायकर आणि वोबीएएस या जातीच्या दुधाळ गायी देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी काळे यांनी चार लाख ८० हजार रुपये त्याला दिले हाेते. वर्षभरापूर्वी हा व्यवहार होऊनही त्याने गायी न दिल्याने ते पैसे परत देण्यासाठी पाठपुरावा करत होते. पैसे देऊनही गायी न मिळाल्याने अखेर काळे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉ. परदेशीवर गुन्हा दाखल केला आहे.