सांगली : वीटभट्टीवर कामासाठी कामगार पुरविण्याच्या आमिषाने हरीपूर येथील व्यावसायिकास पाच लाख १० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी चंद्रशेखर प्रदीप कोरे (रा. हरीपूर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू नामदेव जगन्नाथ, बाळाप्पा कल्लाप्पा पुजारी (दोघही रा. भेंडवाड, जि. बेळगाव), यमनाप्पा हणमंत हरीजन (गणेवाडी दुधोंडी), किरण मारूती नंदीवाले, दिलीप मारूती पाटील (दोघेही रा. नरवाड, ता.मिरज), रवी सिध्दाप्पा मल्लाबादी (रा. करजगी, जि. गुलबर्गा), नागेश बेकनहाळी (रा. पुडिलक आहेरी, जि. विजापूर), बाबू ईराप्पा हुंचनाळे (रा. लेडवाडा, जि. बेळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, कोरे यांचा वीट उत्पादनाचा व्यवसाय आहे. ३० सप्टेंबर ते ११ फेब्रुवारी या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. यात वीटभरणी कामगार पुरविण्यासाठी व कामासाठी पाच लाख १० हजार रुपये घेण्यात आले होते. पैसे घेऊनही संशयितांकडून कामास व कामगार पुरविण्यास टाळाटाळ होत होती. वीटभट्टी कामासाठी केलेल्या करारानुसार त्यांनी एकही कामगार पुरविला नाही आणि त्या कामासाठी घेतलेले पैसेही परत दिले नाहीत.
कोरे यांनी संशयितांकडे वारंवार कामगार पुरविण्याबाबत पाठपुरावा करूनही टाळाटाळ होत असल्याने अखेर त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.