सांगली : कोरोनापाठोपाठ जिल्ह्यावर आता म्युकरमायकोसिस विकाराचे संकट घोंघावते आहे. गुरुवारअखेर पाच रुग्ण सापडले असून त्यांतील एकाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने रुग्णांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना म्युकरमायकोसिस विकार होत असल्याचे देशभरात आढळले आहे. त्यामुळे सांगलीची आरोग्य यंत्रणाही सजग झाली असून, म्युकरमायकोसिसवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालये, मिरज कोविड रुग्णालय, भारती तसेच सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयाकडे रुग्णांची माहिती विचारली आहे. गेल्या जानेवारीपासून कोरोनाचे उपचार घेतलेल्या, बरे झालेल्या तसेच मरण पावलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे होती काय याची माहिती विचारली आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचीही माहिती घेतली जात आहे. त्यानंतर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा फैलाव कितपत झाला, याची निश्चित माहिती मिळेल.
म्युकरमायकोसिसचे उपचार अत्यंत महागडे असून औषधोपचारांचा खर्च लाखोंच्या घरात आहे. या विकारावरील उपचार मोफत केले जातील, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तथापि, या विकारामध्ये रुग्ण दगावण्याचा धोका जास्त असल्याने तो चिंतेचा विषय आहे.
चौकट
पाच बाधित, एकाचा मृत्यू
बामणोली येथील विवेकानंद रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी एकाचा मृत्यू झाला असून, तो पंढरपूरचा आहे. उर्वरित एक विट्याचा व दुसरा अन्य शहरातील आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. राम लाडे यांनी ही माहिती दिली.
कोट
गुरुवारअखेर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण आढळले आहेत. सर्व कोविड रुग्णालयांकडून जानेवारीपासूनची माहिती मागविली आहे, त्यानंतर नेमका फैलाव कळेल.
- डॉ. संजय पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक