सांगली : राज्यातील ८० टक्के राजपत्रित अधिकारी आपला खर्च पगारात भागवितात, तर पाच टक्के अधिकारी वाया गेले असून, त्यांच्यात सुधारणा अशक्य असल्याचे मत राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे खटले जलदगती न्यायालयात चालविले जावेत, अशी मागणीही त्यांनी केली. महासंघाच्यावतीने भ्रष्टाचारमुक्त शासन व प्रशासनासाठी ‘पगारात भागवा’ अभियान हाती घेतले आहे. यानिमित्ताने कुलथे सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्रित अधिकाऱ्यांची कार्यशाळाही घेतली. पत्रकारांशी बोलताना कुलथे म्हणाले की, सध्या शासकीय अधिकारी, कर्मचारी लाच प्रकरणात रंगेहात पकडले जात आहेत. त्यामुळे सर्वच अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, अशी प्रतिमा निर्माण होत आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी ‘पगारात भागवा’ हे अभियान हाती घेतले आहे. राज्यातील ८० टक्के अधिकारी पगारावर खर्च भागवितात, तर २० टक्के अधिकारी भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्यापैकी १५ टक्के अधिकाऱ्यांत सुधारणा करणे शक्य आहे. उर्वरित पाच टक्के अधिकारी पूर्णपणे वाया गेलेले आहेत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे अधिकारी भ्रष्टाचारात सापडतील, त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटले दाखल करण्याची मागणी महासंघाच्यावतीने करण्यात येणार आहे. दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद झाली पाहिजे. भ्रष्टाचार सिद्ध झालेल्यांना महासंघात स्थान दिले जाणार नाही. अशा अधिकाऱ्यांसाठी शासनाकडे महासंघाच्यावतीने शिफारस करून त्यांना पाठीशीही घातले जाणार नसल्याचे कुलथे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)तीन पिढ्या बदनामएखादा अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचारात सापडला, तर त्याच्या तीन पिढ्या बदनाम होतात. त्याच्या आई-वडिलांना मुलांच्या कर्तृत्वाची शिक्षा मिळते, तर अधिकाऱ्याच्या मुलांनाही सार्वजनिक जीवनात वावरताना टोमणे सहन करावे लागतात. अधिकाऱ्याच्या पत्नीलाही चारचौघात अपमानित व्हावे लागते. ही प्रतिमा सुधारण्यासाठी कितीही पैसा ओतला तरी उपयोग होत नाही, असेही कुलथे म्हणाले.
राज्यातील पाच टक्के अधिकारी वाया गेलेले
By admin | Published: October 13, 2015 10:40 PM