शिराळा : येथील पूल गल्ली येथे राहणाऱ्या कमल रामचंद्र देशमुख (वय ६५) यांच्या हातातील पाच तोळे सोन्याच्या बांगड्या अज्ञाताने पॉलिशच्या बहाण्याने चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान घडली. याबाबत उशिरापर्यंत शिराळा पोलिसात नोंद नव्हती. कमल व त्यांचे पती रामचंद्र देशमुख (वय ७०) हे दोघेच घरात असतात. सकाळी अंदाजे ३० वर्षे वयाची अनोळखी व्यक्ती घरात फरशी, भांडी पॉलिश करण्याचे साहित्य विक्री करतो, असे सांगून घरात आली. ही व्यक्ती उन्हातून आली म्हणून देशमुख यांनी त्यास सरबत दिले. यानंतर त्याने पॉलिशचे प्रात्यक्षिक दाखवले. देशमुख यांनी आम्हाला काही नको, असे सांगितले. तरीही त्यांच्या पायातील जोडव्यावर त्याने पॉलिश करून दाखविले. यानंतर त्याने कमल यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांवर पॉलिश लावले. तुम्हाला बांगड्या चकचकीत करून देतो, असे सांगून दोन्ही हातातील बांगड्यात जबरदस्तीने काढून घेतल्या. यानंतर या बांगड्या चुना, हळद तसेच पॉलिश पावडर पाणी टाकून डब्यात ठेवून ते गॅसवर उकळण्यास सांगितले. उकळून झाल्यावर डबा हलका लागला म्हणून कमल यांनी तो डबा उघडला. यावेळी त्यांचा हातही भाजला. डब्यात बागड्या नसल्याचे लक्षात आल्यावर कमल यांनी बाहेर पाहिले. तोपर्यंत तो युवक पळून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी एस. टी. बसस्थानकापर्यंत पाठलाग केला, मात्र तो सापडला नाही. याबाबत पोलिस माहिती घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले, मात्र अद्याप पोलिसात या घटनेची नोंद नाही. (वार्ताहर)
पॉलिशच्या बहाण्याने पाच तोळे लंपास
By admin | Published: April 03, 2016 11:01 PM