रेठरेधरण : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी रंगराव पवार यांनी आपल्या २0 गुंठे शेतामध्ये ‘अमर ३२’ या जातीचे शेवग्याचे पीक घेतले आहे. या झाडांना ५ फूट लांबीच्या शेंगा लागल्या आहेत. याच शेतात पवार यांनी वांगी व मिरचीचे आंतरपीक घेतले आहे. या माध्यमातून त्यांनी वार्षिक २ लाख ७0 हजारांचे उत्पन्न घेतले आहे.आष्टा येथे झालेल्या जयंत कृषी प्रदर्शनामध्ये त्यांच्या बीट व मुळा या पिकांचा द्वितीय व तृतीय क्रमांक आला होता. पवार यांनी २0 गुंठे क्षेत्र भाजीपाला पिकविण्यासाठी ठेवले आहे. जून २0१३ मध्ये ३ फुटी सरी सोडून ६ बाय ६ अंतरावर शेवग्याच्या बिया टोकल्या व मधल्या सरीमध्ये ४ बाय ४ अंतरावर वांग्याची व मिरचीची रोपे लावली. ठराविक अंतराने पाणी, डी. ए. पी. ३ पोती, १0:२६:२६ व पोटॅश २ पोती अशी रासायनिक खतांची मात्रा दिली.१५ सप्टेंबर ते १५ फेबु्रवारी या ६ महिन्यात वांगी पिकातून १ लाख ५0 हजार रुपये मिळाले, तर मिरचीमधून २0 हजार मिळाले. ३0 हजार रुपये शेवगा पिकाचे झाले. या पिकांसाठी ४0 हजार ६00 रुपये खर्च आला. एकूण खर्च वजा जाता २ लाख ७0 हजार रुपयांचे उत्पन्न पवार यांना मिळाले. त्यांनी हे उत्पन्न केवळ २0 गुंठे क्षेत्रात मिळवले. (वार्ताहर)
शेवग्याच्या झाडांना पाच फूट शेंगा!
By admin | Published: July 23, 2014 10:47 PM