सांगली : फाईव्ह स्टार हाॅटेल हे साऱ्यांनाच माहीत असेल. पण आता फाईव्ह स्टार घर ही नवी संकल्पना महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी हाती घेतली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविणाऱ्या घरांना महापालिकेकडून पंचतारांकित घरांचा दर्जा दिला जाणार आहे. या घरांना मालमत्ता करातही सूट दिली जाणार आहे.
महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची जोरदार तयारी चालविली आहे. आयुक्त कापडणीस यांनी त्यासाठी विविध संकल्पना हाती घेतल्या आहेत. आता महापालिका व पर्यावरण संरक्षण गतिविधी संस्थेच्या सहकार्याने शहरात पंचतारांकित घरे हा उपक्रम हाती घेतला आहे. घराला पंचतारांकित दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी काही निकषही पूर्ण करावे लागणार आहेत.
यात घरातच कचऱ्याचे कंपोस्टिंग, घरातील पाण्याचा पुनर्वापर, कमीत कमी ऊर्जेचा वापर, पारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर, घराभोवती पक्षांसाठी निवारा व इतर सुविधा, मित्र, परिवारासोबत कमीत कमी पाच ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड व त्यांचे संगोपन करणाऱ्यांना पंचतारांकित घराचा दर्जा दिला जाणार आहे. या घराच्या दर्शनी भागावर महापालिकेच्यावतीने पंचतारांकितचे चिन्ह लावण्यात येणार असून त्यांना मालमत्ता करातही सवलत देण्यात येणार असल्याचे कापडणीस यांनी सांगितले.
कचऱ्याचे विघटन करण्यास विविध उपक्रम राबविणाऱ्यांना पंचतारांकित (फाईव्ह स्टार) घरे म्हणून नामांकन देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. अशा घरांना मालमत्ता करातही सूट दिली जाणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.