टाकळी : टाकळी (ता. मिरज ) येथील अपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे सुभाषनगर येथील सोनाई मंगल कार्यालयाच्या चालकावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
टाकळी येथील व्यवस्थापन समितीतर्फे टाकळी व सुभाषनगर परिसरात रुग्णसंख्या वाढत असल्याने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये न ठेवता सर्वांना आयसोलेशन वाॅर्डमध्ये नेऊन ठेवण्याची व्यवस्था समितीतर्फे करण्यात आली आहे. टाकळी हायस्कूलमध्येही सर्व सुविधा देऊन रुग्णांना राहण्याची व्यवस्था केली आहे. विनामास्क व गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. टाकळी व्यवस्थापन समितीतर्फे तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमधून आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सुभाषनगर येथील सोनाई मंगल कार्यालयात कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चालक भरत भंडे यांच्यावर पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच महेश मोहिते, तलाठी आर. ई. जमदाडे, ग्रामविकास अधिकारी आर. एस. गंगातीरकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.