सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चोरीच्या ट्रकची विक्री करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. या चोरट्याकडून पोलिसांनी एकूण पाच ट्रक हस्तगत केले आहेत. जमीर राजू शेख (रा. कोल्हापूर रोड, पत्रकारनगर) असे संशयिताचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल, ट्रक चोरीतील संशयितांची तपासणी करण्याचे आदेश एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना दिले होते. त्यासाठी खास पथकही तयार केले. गेल्या आठवड्यात एलसीबीचे सहायक निरीक्षक सुनील हारुगडे, हवालदार अशोक डगळे, राहुल जाधव, सचिन धोत्रे, चेतन महाजन, अरुण पाटील, कुबेर खोत, वैभव पाटील, राहुल जाधव, सलमान मुलाणी, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, सलमा इनामदार हे सांगलीत पेट्रोलिंग करीत, वाहन चोरीसंदर्भातील माहिती जमा करीत होते. यावेळी पोलीस नाईक कुबेर खोत यांना जमीर शेख हा चोरीच्या ट्रकचा व्यवहार करीत असतो, अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता, आणखी चार चोरीचे ट्रक मिळून आले. त्याने पुणे, अथणी, उगार, (कर्नाटक) व सांगली येथून हे ट्रक चोरल्याची कबुली दिली. संशयिताकडून सव्वा लाख रुपये किमतीचे पाच ट्रक पोलिसांनी हस्तगत केले. अधिक तपास सहायक निरीक्षक सुनील हारुगडे हे करीत आहेत. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.