संख : पाणी संघर्ष समितीच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली ६४ गावांतील कार्यकर्त्यांची बैठक श्रीसंत बागडे बाबा मठात झाली. यामध्ये ६४ गावांनी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आवटे यांनी केलेली शिष्टाई व्यर्थ ठरली.पूर्व भागातील दरीबडची, गिरगाव, जालिहाळ बुद्रुक, तिकोंडी, भिवर्गी, लमाणतांडा (दरीबडची), करेवाडी (कों.बो), खंडनाळ, गुड्डापूर, तिल्याळ या ग्रामपंचायतींनी मतदानावर बहिष्काराचा ठराव संखच्या अप्पर तहसीलदारांना दिला होता. पूर्व भागातील ६४ गावे म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
आवटे म्हणाले, निवडणुकीवर बहिष्कार टाकणे चुकीचे आहे. लोकशाहीला बाधक आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करा. तुमच्या भावना शासनाला कळवू. तुम्ही मतदान करून योग्य नेता निवडा. त्यांच्याकडून प्रश्न सोडवा.तुकारामबाबा म्हणाले, पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा सुरूच राहणार आहे. जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय मंचावर जाणार नाही.
पाणी आंदोलन राजकारणविरहित सुरु आहे. कोणतीही निवडणूक लढविणार नाही. माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर मोरडी म्हणाले, एक तर आम्हाला तातडीने पाणी द्यावे. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला कर्नाटकात पाठवावे.
यावेळी भीमाशंकर बिरादार, ईरय्या पुजारी, मल्लू पुजारी (गुड्डापूर), राजू पुजारी (खंडनाळ), चंद्रशेखर रेबगोंड, महेश बागेळी, तिल्याळचे सरपंच सुरेश कटरे, गिरीश कुंभार यांचीही भाषणे झाली.