सांगली : दि सांगली रोझ सोसायटी आणि मराठा समाजातर्फे आयोजित पुष्पप्रदर्शनास शनिवारपासून सांगलीत सुरुवात झाली. संजय घोडावत ग्रुपच्या गुलाबाने यंदाचा किंग आॅफ द शो आणि क्विन आॅफ द शो हे दोन्ही मानाचे किताब पटकावले.
वासुंबे (ता. तासगाव) येथील संभाजी पाटील या शेतकºयाच्या फुलास प्रिन्स आॅफ द शो, तर कुंडल फॉरेस्ट अॅकॅडमीच्या गुलाबास प्रिन्सेस आॅफ दी शो चा किताब मिळाला. फुलांच्या सुंदर दुनियेत सांगलीकर हरवल्याचे चित्र दिसून आले. सांगलीत दोन दिवस हे प्रदर्शन चालणार आहे
सांगलीच्या मराठा समाज सांस्कृतिक भवनात शनिवारी सकाळी पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मराठा समाज संस्थेचे प्रकाश चव्हाण, सुधीर सावंत, तानाजीराव मोरे, अशोक सावंत, ए. डी. पाटील, ज्योती चव्हाण, पद्मजा सावंत, श्रेया भोसले, नंदा झाडबुके, गिता दप्तरदार, अश्विनी पाचोरे, पद्मजा चौगुले आदी उपस्थित होते.
यावेळी सुहेल शर्मा म्हणाले की, फुले प्रत्येक माणसाला आनंद देत असतात. माणसांनी फुलांप्रमाणे आनंद द्यायला शिकले पाहिजे. सांगलीसारख्या सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या शहरात अशाप्रकारचे पुष्पप्रदर्शन भरत असल्याने सांगलीची आणखी वेगळी ओळख निर्माण होत आहे. हे प्रदर्शन राज्यस्तरीय करण्याच्या दृष्टीने संयोजकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दि रोझ सोसायटीचे गिरीश चितळे म्हणाले की, भावी पिढीने या पंरपरेत लक्ष घालण्याची गरज आहे. आपल्याकडील फुले परदेशी जात असल्याने ग्राहक आणि विक्रेते यांचे हे जाळे विस्तारत आहे.
पुष्परचना स्पर्धेत डिस्प्ले पुष्प मांडणी या गटात संजय घोडावत व गार्डन कन्सेप्ट नर्सरीच्या यश दप्तरदार यांना अुनक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले. फुल विक्रेत्यांसाठी आयोजित स्पर्धेत अलंक्रिता इव्हेन्टस् व डेकोरेटर्स यांना प्रथम व जॅपनिज फ्लोरिस्ट यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस पटकावले. ग्लॅडिएटर पुष्परचना गटात तासगाव येथील सुरेश माईनकर, संदिप माईनकर व संजय घोडावत ग्रुप यांना प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच ग्रीन हाऊसमधील गुलाब स्पर्धेतील सर्व बक्षिसे संजय घोडावत ग्रुपने पटकाविली. जर्बेरा गटातील स्पर्धेतही घोडावत ग्रुपने बाजी मारली. कॉर्नेशन विभागात मनोज माणिक पाटील, मनोज संजय शिंदे, मनोज माणिक पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसे मिळविली. खुल्या पुष्परचना स्पर्धेत भाग्यश्री काकडे, विनायक शिखरे, रतन आनंदा हिरवे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविले.
मतिमंद मुलांनी वेधले लक्षमतिमंद मुलांसाठी आयोजित स्पर्धेत प्रथमेश रमेश अष्टेकर, वृषाली संजय चव्हाण, विनायक मिरजे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय तर आकांशा गायकवाड, आफरा तांबोळी यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली. त्यांनी केलेली पुष्परचना लक्षवेधी ठरली. पंधरा वर्षाखालील मुलांसाठी आयोजित स्पर्धैत आयुष सुनील पाटील, नेहा रोहित पाटील, शिवप्रताप शिवराज काटकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर कार्तिक लोहार, सुनिता पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली.
पंढरीच्या वारीने जिंकली मनेप्रदर्शनाअंतर्गत दरवर्षी एक वेगळी संकल्पना फुलांमधून मांडण्यात येते. गतवर्षी मिरजेच्या संगीत परंपरेचा इतिहास मांडला होता. यंदा पंढरीच्या वारीचे संपूर्ण दृश्य फुलांच्या मांडणीतून येथे साकारण्यात आले आहे. या सुंदर संकल्पनेने सांगलीकर भारावून गेले.
मोर साकारला १६ तासात पुष्पप्रदर्शनाच्या मध्यभागी दोन मोरांच्या प्रतिमा आर्किड फुलांच्या माध्यमातून साकारण्यात आल्या आहेत. कलकत्ता येथील चार कलाकारांना ही पुष्परचना साकारताना १६ तास लागले.