सांगली : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 व्या वर्धापन दिनोत्सवाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार, दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते संपन्न होणार आहे. ही माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.जास्तीत जास्त व्यक्तींना ध्वजारोहणाच्या या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी कोणत्याही कार्यालयाने अथवा संस्थेने त्यांच्या कार्यालयाचे ध्वजारोहण या दिवशी सकाळी 8.30 ते 10 या वेळेत आयोजित करू नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ या दिवशी सकाळी 8.30 च्या पूर्वी किंवा 10 च्या नंतर करावा.भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी 6.30 ते 7.30 वाजेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, विश्रामबाग येथे शासकीय ध्वजारोहण व ध्वजवंदन.ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये. जिल्ह्यातील जनतेने पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे होणाऱ्या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये -जिल्हाधिकारी राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे.दरवर्षी प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिकांकडून कागदाच्या व प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात.
असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केलेली आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता नाही. कार्यक्रमानंतर असे कागदी व प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज संबंधिताकडून इतस्तत: टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.
या अनुषंगाने सर्व शैक्षणिक संस्था व इतर सर्व आस्थापनांना आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी जनतेने देखील आवश्यक काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.