२९ दुपटे ०१ : व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने गुरुवारी देवेेंद्र फडणवीस यांना व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले. यावेळी, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पूरग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाने भरीव मदत करून विविध कर माफ करावेत, अशी मागणी गुरुवारी व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी दिली.
सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या फडणवीस यांची व्यापाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे नेते शेखर इनामदार उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सांगली शहर सातत्याने महापुरामुळे अडचणीत आहे. यात सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षात व्यापाऱ्यांचा आर्थिक कणा या संकटांनी मोडला आहे. मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने व्यापाऱ्यांना, नागरिकांना तातडीने मदत दिली होती. सध्या सलग ४ महिने सांगलीचे व्यापारी लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. लॉकडाऊन सुरू असताना, पुन्हा महापुराने येथील बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. व्यापारी आधीच लॉकडाऊनमध्ये कंगाल झाला असताना महापुराने नुकसानीत भर टाकली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना भरीव आणि ठोस मदत केल्याशिवाय तो पुन्हा उभारू शकणार नाही. सत्ताधारी सरकारकडून फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घ्याव्यात. कोणतेही जाचक पंचनामे न करता, ज्या दुकानात पाणी गेले आहे, अशांना तातडीने रु. १ लाखाची मदत मिळावी, किमान १ वर्षाचे स्थानिक कर माफ व्हावेत, लॉकडाऊन काळ आणि पूरस्थितीला अनुसरून ६ महिन्यांचे वीजबिल माफ व्हावे, सर्व व्यावसायिक कर्जाचे ६ महिन्यांचे व्याज विनाअट माफ करावे व सर्व हफ्ते भरण्यास बिनव्याजी ६ महिन्यांची मुदत मिळावी, विनातारण आणि माफक व्याजदरात तत्काळ या व्यापाऱ्यांना कर्ज वितरण व्हावे, राज्य सरकारने, केंद्रशासित सर्व कर ६ महिन्यांसाठी माफ करून आणावेत, तसा पाठपुरावा करावा, पूरग्रस्त बाजारपेठेत परत कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन करू नये व दुकानांची वेळ वाढवून द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.