लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध झुगारून शुक्रवारपासून बाजारपेठेतील दुकाने सुरू करण्याचा इशारा भाजपसह व्यापारी संघटनांनी दिला होता. त्यामुळे व्यापारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता होती; पण कृष्णा नदीला आलेल्या पुराने हा संघर्ष टाळला. बाजारपेठेतील सर्वच दुकाने उघडली; पण व्यापाराऐवजी साहित्य बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू होती.
गेल्या साडेतीन महिन्यांपासून शहरातील बाजारपेठ बंद आहे. त्यात कोरोना रुग्णांची संख्याही घटली नसल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली. शहरात कोरोनाचा पाॅझिटिव्हिटी दर कमी असतानाही बाजारपेठ खुली न केल्याने व्यापाऱ्यांत नाराजी पसरली होती. व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा यांनी शुक्रवारी दुकाने उघडण्याचा इशारा दिला होता. त्यातच भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांनीही प्रशासनाला शुक्रवारपर्यंतची मुदत दिली. व्यापाऱ्यांची दुकाने कुठल्याही स्थिती उघडण्याचा निर्धार भाजप नेत्यांनी केला होता.
पण गुरुवारी रात्रीच कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आणि प्रशासनाच्या भूमिकेतही बदल झाला. शहरात ५० ते ५२ फुटांपर्यंत पुराची पातळी जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली. आयुक्त नितीन कापडणीस यांनी सकाळीच व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास मुभा दिली. पुराचे पाणी बाजारपेठेत येण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांनी दुकानातील माल, साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासूनच व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून साहित्याची जुळवाजुळव सुरू केली होती. सकाळी दहा वाजता खा. संजयकाका पाटील, आ. गाडगीळ यांच्यासह नगरसेवक बाजारपेठेत आले. त्यांनी दुकाने उघडण्याचे आवाहन केले; पण तत्पूर्वीच दुकाने सुरू झाली होती; पण व्यापाराऐवजी साहित्य बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांची गडबड सुरू होती.