सांगलीत पूरग्रस्तांसाठी विविध क्षेत्रांतून मदतीचा ओघ सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील पूरग्रस्तांसाठी मदतीचाही महापूर सुरू झाला आहे. अनेक संस्था, संघटना व तरुण मंडळे मदतीसाठी सरसावली आहेत.
शहराचा गावठाण भाग पूरग्रस्त झाला असला तरी उर्वरित ७० टक्के शहर पुरापासून सुरक्षित आहे. तेथील संस्था, संघटना मदतीसाठी धावाधाव करीत आहेत. पुरामध्ये अनेक नागरिक घरातच अडकून पडले आहेत. त्यांना दूध, पिण्याचे पाणी, बिस्किटे, जेवण पुरविले जात आहे. सर्वाधिक गरज पाणी आणि दुधाची आहे. मदतीच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रबरी बोटीतून मदत पोहोचविली जात आहे. जनावरांसाठीही वैरण, पशुखाद्य उपलब्ध करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रातील २६ निवारा केंद्रांमध्ये तीन हजार पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे. त्यांच्यासाठी महापालिकेतर्फे चहा, नाश्ता व जेवण दिले जात आहे. आता सेवाभावी संस्थाही मदत करीत आहेत. नागरिक जागृती मंचने सेवाभावी संस्था, गणेशोत्सव मंडळे, दानशूर व्यक्तींची जिल्हा संपर्क व आपत्ती व्यवस्थापन कृती समिती स्थापन केली आहे. त्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू आहे. सुधार समितीनेही कार्यकर्त्यांची फळी सक्रिय केली आहे. वैद्यकीय मदत, अन्न, वस्त्र, निवारा आदी सोय सुरू आहे. आयुष सेवाभावी संस्था, राॅयल कृष्णा बोट क्लब, युवक मराठा क्रीडा संस्था, राॅयल युथ फाउंडेशन, टीम विशाल, असिफ बावा प्रतिष्ठान, मावळा प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांनीही सामाजिक बांधिलकी जपली आहे. आमदार सुधीर गाडगीळ युवा मंच, पृथ्वीराज पाटील फाउंडेशन, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आदी संघटनाही सरसावल्या आहेत.
चौकट
यंदा बाहेरून मदत नाही
२०१९ च्या महापुरामध्ये संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सांगली, कोल्हापूरकडे आला होता. परदेशातूनही मदत मिळाली होती. ती इतकी प्रचंड होती की, त्याचे व्यवस्थापन व वितरण करणे हेच मोठे काम होऊन बसले होते. यंदा तितकाच मोठा महापूर व वित्तहानी झालेली असतानाही बाहेरून मदत अजिबात आलेली नाही. कोरोना व लॉकडाऊनमुळे लोकांचा आर्थिक गाडा ठप्प झाला आहे, त्यामुळे मदतीसाठी कोणीही पुढे आलेले नाही.