अंकलखोप : अंकलखोप (ता. पलुस) येथे भारती विद्यापीठ हुतात्मा भगतसिंग हायस्कूलमध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी टोप-दिघंची महामार्गाच्या रूंदीकरण कामामुळे पुराचा फटका बसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कदम यांनी दिले.
अंकलखोपमधील ४०० नागरिक व ३५० जनावरे भगतसिंग हायस्कूल येथे स्थलांतरित झाली आहेत. मंत्री कदम यांनी यावेळी या नागरिकांच्या व जनावरांच्या व्यवस्थेबाबत माहिती घेतली. टोप-दिघंची महामार्गच्या रूंदीकरणामुळे अंकलखोप-भिलवडी रस्त्यावर ज्याठिकाणी पाणी येऊन रस्त्याची समस्या निर्माण झाली आहे, त्याठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली. मंत्री कदम यांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली व या रस्त्याच्या कामावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
महापुरामुळे बाधित लोकांना निवारा केंद्रात ठेवले आहे. त्याठिकाणाच्या सर्व लोकांची कोरोनासंबंधीची ॲन्टिजन चाचणी करून घ्या व कोणी पाॅझिटिव्ह सापडल्यास त्या व्यक्तीची वेगळ्या खोलीमध्ये सोय करा अथवा कोरोना केअर सेंटरला पाठवा. यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही. अन्यथा निवारा केंद्रातील सर्व लोक बाधित होतील.
यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार श्रीनिवास ढाणे, सरपंच अनिल विभुते, उपसरपंच स्वाती पाटील, विनय पाटील, अशोक चौगुले उपस्थित होते.