बोरगाव : एकीकडे कृष्णाकाठ महापुरामुळे हतबल झाला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये शेतीचे, घरांचे व जनावरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. महापुराला आठ दिवस उलटूनही अद्याप शासकीय मदत मात्र पंचनाम्यांमध्ये अडकली आहे. राज्यभरातील नेते व वरिष्ठ अधिकारी पूरबाधित परिसरात दौरे करीत आहेत. नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत; परंतु यानंतरही शासनस्तरावर पूरग्रस्तांच्या मदतीबाबत काेणतीही हालचाल दिसत नाही. यामुुळे संतप्त पूरबाधित जनता ‘आता भेटी नकोत, मदत द्या’ अशी आर्त हाक देत आहेत.
महापुरामुळे कृष्णा व वारणा काठावर होत्याचे नव्हते झाले आहे. शेती पाण्याखाली जाऊन हाता-तोंडाला आलेली पिके कुजून गेली आहेत. ऊस, सोयाबीन, भुईमूग, केळी, मका व कडधान्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उघडे पडले आहे. शेकडाे घरांची पडझड झाली आहे. कुटुंबे बेघर झाली आहेत. जनावरांचेही स्थलातंर करावे लागले. मंत्रिमहाेदय, वरिष्ठ अधिकारी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून जात आहेत. यानंतरही पंचनाम्याच्या नावाखाली पूरबाधितांची चेष्टा सुरू आहे. जनतेला किमान जगण्यासाठी तत्काळ स्वरूपाची मदत द्या, अशी मागणी होत आहे.
२०१९ च्या महापुरात शासनाकडून चौथ्या दिवशी मदत दिली गेली होती. मात्र, यंदा आठ दिवस उलटूनही मदत पंचनाम्यात व कागदातच अडकून राहिली आहे. पूरबाधित कुटुंबे आता पुरती हतबल झाली आहेत. अनेक जण जगण्यासाठी खासगी सावकार अथवा बँका-पतपेढ्यांचे उंबरठे झिजवू लागले आहेत.
मदतीचा फार्स न करता पूरबाधितांना प्राथमिक मदत तरी लवकरात लवकर द्या, अशी मागणी हाेत आहे.