फोटो ओळ : शिरटे (ता. वाळवा) येथून महाड येथील पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : शिरटे (ता. वाळवा) येथे २०१९ मध्ये महापुरावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदत मिळाली होती. तिची जाणीव ठेवत येथील युवकांनी पाचशे किट तयार करून त्यांचे वाटप रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त महाड येथे पाठविले आहे.
कोकणात महापुराने प्रचंड नुकसान झाले. अनपेक्षित ओढवलेल्या संकटाने सगळेच हतबल झाले आहेत. यावेळी शिरटे गावातही पूर आला; पण २०१९ च्या महापुराएवढे नुकसान झाले नाही. त्यामुळे युवकांनी २०१९ च्या महापुरावेळी मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवीत कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्याचा निश्चय केला.
सोशल मीडियाद्वारे ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले.
युवकांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला साद घालीत गावकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. दोन ते तीन दिवसांत चारशे ते पाचशे कुटुंबांना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू व कपड्याचे साहित्य जमा झाले. जमा झालेल्या साहित्याचे किट बुधवारी (दि. २८) महाड येथे पूरग्रस्त कुटुंबांना वाटप करण्यात आले.