मिरज : मिरजेत कृष्णा नदीची पाणीपातळी ६६ फुटांवर पोहोचल्याने पाणी शहरापर्यंत आले. वर पाणी आल्याने म्हैसाळ रस्ता बंद झाला असून या रस्त्यालगत असलेली झोपडपट्टी व चांद काॅलनीत पाणी शिरले आहे. येथील अडीचशे कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत.
महापुराच्या संकटाला तोंड देत मिरजेत नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर कृष्णाघाट, चांद कॉलनीसह उपनगरातील सुमारे आठ हजार नागरिकांनी महापालिका शाळेत व सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. कोरोना आपत्तीमुळे रोजगार गेल्याने हतबल नागरिक आता पुराचा सामना करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी नदीकाठासह मिरजेतील कृष्णाघाट, राजीव गांधीनगर, चांद कॉलनी, पिरजादे प्लॉट या शहराच्या विस्तारित भागात महापुराचा फटका बसला होता.
शहरात चांद कॉलनी व उपनगरात तब्बल दहा दिवस पुराचे पाणी होते. येथील घरे सात ते आठ फूट पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. यातून सावरत असताना कोरोना व आता पुन्हा महापुराचे संकट आले आहे. प्रशासनाच्या सूचनेमुळे येथील नागरिकांनी जून महिन्यातच स्थलांतराची तयारी केली होती. यावर्षीही पाऊस तसेञ धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे पाणीपातळी वाढून नदीचे पाणी शहरापर्यंत पोहोचले आहे. रविवारी पहाटे चांद काॅलनीत पाणी शिरल्याने रहिवाशांना स्थलांतर करावे लागले. पाणी वाढत असल्याने पूरपट्ट्यातील रहिवाशांत घबराट होती. मिरजेतील चांद कॉलनी, राजीव गांधी नगरसह काही भागांतील काही रहिवाशांनी नातेवाइकांकडे, तर काही कुटुंबांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात आश्रय घेतला आहे. पुराचा सामना करणाऱ्या पूरपट्ट्यातील नागरिकांना पाणीपातळी कमी होण्याची प्रतीक्षा आहे.
चाैकट
जॅकवेल पाण्यात; पंप हाऊस बंद हाेण्याची भीती
पाणीपुरवठा विभागाची कृष्णा घाटावरील जॅकवेल बुडाली असून पाणी उपसा यंत्रणेचा विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी महावितरणने थेट वीजपुरवठा सुरू करून पंप सुरू ठेवले आहेत. आणखी पाच फूट पाणीपातळी वाढल्यास पुराचे पाणी शिरुन पंप हाऊस बंद होणार आहे. पुरामुळे कृष्णा घाट परिसराचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असला तरी पंप हाऊस सुरू असल्याने मिरज शहराला पाणीपुरवठा सुरू आहे.