सांगली : शहरातील नागरी वस्तीत सोमवारी पुराचे पाणी शिरले. कर्नाळ रोड, जामवाडी सूर्यवंशी प्लॉट येथील दहाहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कर्नाळ रोडवर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुपारपर्यंत कृष्णा नदीची पाणीपातळी ३४.३ फुटावर गेली होती.कोयना धरणातील विसर्ग आणि संततधार पावसामुळे कृष्णा नदीचे पाणी पातळी फुटाफुटाने वाढत आहे. सकाळी सात वाजता पाणी पातळी ३१.८ फुट होती. दुपारी दोन वाजता पाणी पातळी तीन फुटाची वाढ झाली. कृष्णा नदी इशारा पातळीकडे जात आहे.सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट येथील तीन ते चार घरात पुराचे पाणी शिरले आहे कर्नाळ रोडवरील आठ ते दहा घरालाही पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे या सर्व कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
कर्नाळ रोडवर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. नदीकाठावर बघ्यांची गर्दी होऊ लागल्याने तिथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आयर्विन पुलावरून पोलिसांचा पहारा आहे.