सांगली : जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने मंगळवारी दहा हजाराने विसर्ग वाढवून ४२ हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून पुन्हा विसर्ग कमी करून धरणातून आठ हजार ९२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तब्बल पाच दिवसांपासून पाण्याखाली गेलेले २६ मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले. दरम्यान, कृष्णा नदीची पाणीपातळी बुधवारी एक फुटाने वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासांत १०७ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात ८५.४५ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारपासून धरणातून दहा हजाराने क्युसेक विसर्ग वाढविला आहे. धरणातून ४२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरण क्षेत्रात ७१ मि.मी. पाऊस झाला आहे. पाऊस कमी असल्यामुळे धरणातील विसर्ग कमी केला आहे. सध्या धरणातून आठ हजार ९२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दिवसभरात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत एक ते दीड फुटाने कमी झाली. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी सायंकाळी ३८.०६ फुटांवर आली होती.पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील पाच हजार नागरिकांचे स्थलांतर केले आहे. जिल्ह्यातील २४ पूल आणि १२ बंधारे पाण्याखाली कायम आहेत. जिल्ह्यातील ५६ रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यापैकी २६ रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतुकीसाठी मंगळवारी सुरू केले आहेत. अद्यापही २५ रस्त्यांवर पाणी असल्याने त्यासाठी पर्यायी मार्गावरून सुरू असलेली वाहतूक कायम आहे.
कृष्णेची दोन फुटाने पाणीपातळी वाढणार सध्या नदीची पाणीपातळी ही जरी कमी होत असली तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळे कोयना व सातारा जिल्ह्यातील इतर धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बुधवारी कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी अंदाजे १ ते २ फूट वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक आणि शेतकरी यांनी सतर्क राहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.
धरणातून असा आहे विसर्गधरण - विसर्ग (क्युसेक)कोयना - ४२१००धोम - ४५३कन्हेर - ४६२२उरमोडी - ५००तारळी - ३५२६वारणा - ८०९२
अलमट्टीतून साडेतीन लाखाने विसर्ग होणारअलमट्टी धरणातील पाणीसाठा ६७.८५ टीएमसी झाला असून, तीन लाख दोन हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणातून तीन लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. मात्र, आवक वाढत असल्याने कोणत्याही क्षणी तीन लाख ५० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला जाणार आहे, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.