सांगली : शहरातील महापुराची पाणीपातळी ५१ फुटांवर जाताच महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडली. कृष्णा नदीतील जॅकेवल परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठावर पाणीच पाणी, तर उपनगरात पाणीटंचाई अशी स्थिती आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यास सुरुवात केली आहे. आणखी चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सांगली व कुपवाड या दोन शहरांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. महापुराचा फटका पाणीपुरवठा विभागालाही बसला आहे. जॅकेवलला महापुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे महापालिकेने पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी मार्केट यार्ड, विश्रामबाग, संजयनगर, अभयनगर, लक्ष्मी देऊळ, साखर कारखाना परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही पाण्याच्या टाक्या अर्धा भरण्यात आल्या होत्या. त्यातून काही भागांत सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. कुपवाड शहरातही पाण्याची टंचाई जाणवत आहे.
दरम्यान, कृष्णा नदीची पाणीपातळी ४८ फुटांपर्यंत आल्याशिवाय पाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित होणार नाही. त्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस वाट पहावी लागणार आहे, तसेच पुरामुळे पाणीपुरवठा यंत्रणेतही दुुरुस्ती करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. पाण्याची पातळी उतरताच पंप व इतर साहित्याची दुरुस्ती करून तातडीने पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.