सांगली : संततधार पावसाने कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून सांगलीतील पूरस्थितीमुळे येथील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. बुधवारी सकाळी १२ वाजेपर्यंत सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमधील ७0 लोकांचे स्थलांतर महापालिका शाळांमध्ये करण्यात आले आहे. नदीची पाणीपातळी सध्या ३५.६ फूट असून इशारा पातळी गाठण्यास केवळ साडे चार फुटाचे अंतर राहिले आहे.
सांगली शहरातील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी गतीने वाढत आहे. नदी पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे सोमवारी रात्री १७ फुटांवर असलेली पाणीपातळी बुधवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ३५ फुटांवर गेली होती. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये आता पाणी शिरले असून कर्नाळ रस्त्यावरही पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सूर्यवंशी प्लॉटमधील सुमारे २0 घरांमध्ये पाणी घुसले असून याठिकाणच्या अन्य कुटुंबांना तसेच मगरमच्छ कॉलनीतील शेकडो घरांना स्थलांतराच्या सूचना महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्थलांतर सुरू केले आहे. ज्यांना नातेवाईकांकडे स्थलांतराचा पर्याय नाही, अशा लोकांना महापालिकेने शाळा क्र. १ व ९ मध्ये स्थलांतरीत करून त्यांना सुविधा पुरविल्या आहेत.
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अशीच वाढ होत राहिली तर इशारा पातळी गाठण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे महापालिकेने याबाबत सतर्कता बाळगली आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये सातत्याने कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. कोयना धरणात सध्या ७१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
दरम्यान, खेरडेवाडी- तोंडोली, सोहोली, कडेगाव, नेरली जिल्हा मार्ग ८८ किमी १०/२००ता. कडेगांव (महादेव ओढा) फरशी पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे. मात्र कडेपुर ता. कडेगांव मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे. तसेच कांदे सावर्डे पुल जिल्हा मार्ग ६ कि.मी.१२/५०० (तालुका शिराळा) कांदे पुल जोडरस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद आहे. मात्र सागाव -कोल्हापूर मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे. तसेच आरळा शित्तूर राघुचावाडा (तालुका शाहुवाडी) जिल्हा मार्ग-१ किमी १५/३५० रस्त्यावर पाणी आलेने वाहतुक बंद केली आहे.मात्र शित्तूर-तुरुकवाडी-मलकापुर-निळे-भेंडवडे-उदगिरी मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.