लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : चांगले काम करणाऱ्यांना नेहमीच खडतर परिस्थितीतून जावे लागते. कारण चांगुलपणाचा प्रवास हा उलट्या दिशेचा असतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
स्वातंत्र्यसैनिक नामदेवराव कराडकर आणि मातोश्री शांता कराडकर स्मृती ‘सेवारती पुरस्कार’ प्रदान सोहळा बुधवारी सांगलीत पार पडला. यंदा हा पुरस्कार अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांना डॉ. भवाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे होते.
यावेळी भवाळकर म्हणाल्या की, समाजात चांगला आणि वाईटाचा प्रवाह हा निरंतर वाहत असतो. आपण नेहमी चांगुलपणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात कोणत्याही चांगल्या कामाला विरोध हा असतोच, परंतु त्या विरोधाकडे दुर्लक्ष करून आपण समाजजागृतीचे कार्य सुरू ठेवले पाहिजे. अंनिसच्या कार्यकर्त्यांना अद्यापही विरोध होतो. परंतु, ज्या ध्येयाने नरेंद्र दाभोलकर यांनी समितीची स्थापना केली त्यापासून जराही न ढळता त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवलेले कार्य कौतुकास्पद आहे.
गौतमीपुत्र कांबळे म्हणाले, प्रवाहासमवेत सर्वच पोहत असतात. परंतु प्रवाहाच्या विरोधात पोहणे धैर्याचे काम असते. ते धाडस अंनिसने दाखविले आहे. त्यांचे कार्यकर्ते अविरत समाजहिताचे कार्य करीत असतात. प्रवाहाला झुगारून देणाऱ्यांना एक क्षणभरही विश्रांती घेता येत नाही. अंनिसचे काम अत्यंत मोलाचे आहे. त्यामुळेच आज त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विचारांमध्ये मतभेद असले तरी कोणाचाही व्देष न करता वाटचाल करणे अत्यंत महत्वाचे असते. प्रत्येकाने नेणिवेचे रुपांतर जाणिवेत करणे आवश्यक आहे.
डॉ. दिलीप शिंदे यांनी पुरस्कारप्राप्त राहुल थोरात यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कराडकर यांनी केले तर आभार राजेश कराडकर यांनी मानले.
कार्यक्रमास प्रा. डॉ. बाबुराव गुरव, नामदेव माळी, अरूण दांडेकर, संजय ठिगळे, डॉ. संजय निटवे, प. रा. आर्डे, नामदेव भोसले, मुस्तफा मुजावर, डॉ. दिलीप शिंदे उपस्थित होते.
चौकट
विचार कृतीतून जिवंत ठेवला
राहुल थोरात म्हणाले, मला मिळालेला पुरस्कार हा जबाबदारीचा आहे. महाविद्यालयीन जीवनापासून अंनिसच्या कार्यात मी सहभागी झालो. दाभोलकर हे व्यक्ती नसून विचार आहेत. त्यांचा खून केल्याने अंनिसची चळवळ मागे पडेल असे सनातनींना वाटले. दाभोलकर असताना अंनिसच्या १५० शाखा होत्या. मात्र, हत्येनंतर त्या ३२० झाल्या आहेत. याचा अर्थच दाभोलकरांचा विचार प्रामुख्याने देशाच्या भावी पिढीला पटत आहे.