जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टेंभू योजनेच्या खरसुंडी येथील वितरिकेची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : टेंभू योजनेच्या खरसुंडी वितरिकेतील विमोचक, वितरण हौद, चेंबर, व्हॉल्व्ह केबीन आदीची पाहणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी केली. या योजनेत जीपीएस तंत्रावर आधारित पाणी मीटर बसविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली, त्यामुळे पाण्याच्या विसर्गाची नेमकी माहिती ऑनलाईन स्वरुपात मिळणार आहे.
टेंभू योजनेतील इन्सेग्रेशन टाईप, अल्ट्रासोनिक व फ्लोट्रोमॅग्नेटिक पद्धतीच्या फ्लो मीटरची माहिती जयंत पाटील यांनी घेतली. सध्या जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्पांत वितरिकेतून शेतीला पुरवले जाणारे पाणी मोजण्यासाठी काटेकोर यंत्रणा नाही. प्रत्येक वितरिकेवर मीटर बसविण्याचे नियोजन असले तरी प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही. टेंभू योजनेत मात्र आता जीपीएस तंत्र वापरलेले मीटर बसवले जाणार आहेत, त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण ऑनलाईन स्वरुपात कळेल. पाणी कमी-जास्त मिळत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी निकाली निघतील.
मंत्री पाटील यांनी खरसुंडी वितरिका व बंदिस्त नलिका कामांना भेट दिली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता ए. व्ही. हारुगडे, सहाय्यक अभियंता प्रमोद व्हनमाने, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, या कामासाठी ५३.८८ कोटींचा निधी मिळेल. १ हजार ७०० ते २००० मिलिमीटर व्यासाच्या व ८१.३४ किमी लांबीच्या उच्च तंत्रज्ञानाच्या वाहिन्या वापरल्या जातील. टेंभूसाठी २२ टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. त्यामध्ये खरसुंडी वितरिका सर्वात मोठी आहे.
चौकट
आटपाडीतील १८ गावे सिंचनाखाली
खरसुंडी वितरिकेमुळे आटपाडीच्या शेतीच्या पाण्याची समस्या निकाली निघेल. आटपाडी, खरसुंडी, बनपुरी, बाळेवाडी, मिटकी, तळवडे, शेटफळे, लेंगरेवाडी, माडगुळे, मासाळवाडी, माळेवाडी, करगणी, धावडवाडी, कानकात्रेवाडी, गोमेवाडी, भिंगेवाडी, यमाजी पाटीलवाडी, खानजोडवाडी या अठरा गावांना लाभ होईल.