लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेली पन्नास वर्षे फुलांच्या व्यवसायातून वेगळी ओळख निर्माण करणारे सांगलीचे ‘आपटे फुलवाले’ म्हणजेच उमेश शंकर आपटे (वय ७३) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. निधनानंतर सोशल मीडियावरून विविध व्यावसायिकांनी, व्यापाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मारुती रोड आणि आपटे फुलवाले एकमेकांशी जोडले गेलेले नाव आहे. ३० जून १९७१ रोजी वयाच्या २४ व्यावर्षी घरच्यांचा विरोध पत्करून उमेश आपटे यांनी फुलांच्या व्यवसायात पदार्पण केले. नुकतीच त्यांच्या व्यवसायाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यांनी बी. कॉम.पर्यंत शिक्षण घेतले होते. घरात वडील, भाऊ आणि बहीण शिक्षक असताना व त्यांना बँकेतून नोकरीचा कॉल आलेला असताना त्यांनी फुलांचा व्यवसाय निवडला. छोट्या फुलाच्या दुकानात बसून विविध प्रकारचे हार आणि व्यवसायातील खाचा-खोचा समजून घेऊन ‘आपटे फुलवाले’ या दुकानाची मुहूर्तमेढ रोवली होती. एकही दिवस दुकान बंद न ठेवता रोज सकाळी साडेसहा वाजता दुकान उघडणारच हा नियम त्यांनी पन्नास वर्षे पाळला होता.