मिरज : मिरजेत किल्ला परिसरात उंबराच्या झाडावर फूल आल्याच्या घटनेमुळे शनिवारी दर्शनासाठी एकच गर्दी जमली. त्यानंतर अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत उंबराच्या झाडाचे फूल नसून, बुरशी आल्याचा दावा केला. याबाबत वाद निर्माण होऊन प्रकरण पोलिसांत गेले. किल्ला भागात सुनील सुर्वे या शिक्षकाच्या घरात दत्त मंदिर व उंबराचे झाड आहे. फांदीला शनिवारी सकाळी पिवळ्या रंगाचे फूल आल्याचे दिसले. ही दुर्मिळ घटना व दैवी चमत्कार असल्याचा गवगवा झाल्याने फूल पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. महिलांनी उंबराच्या झाडाची पूजा केली. उंबराच्या झाडाखाली असलेल्या दत्त मंदिरात होमहवन यासह धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. प्रदीप पाटील, ज्योती आदाटे व कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी वनस्पतीशास्त्रानुसार उंबराच्या झाडाला फूल येत नसून, फुलाच्या आकारातील विशिष्ट बुरशी असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांचेही प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, मात्र फुलाचे दर्शन घेण्यासाठी महिला येतच होत्या. सुनील सुर्वे यांच्याकडून बुरशीला उंबराचे फूल म्हणून भासवून फसविण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पोलिसांत दिली. याबाबत सुनील सुर्वे यांच्यावर कारवाईची मागणी केली, तर सुर्वे यांनी कोणालाही फसविले नसल्याचा दावा केला. उंबराच्या झाडावर उमललेल्या कथित फुलामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात वाद सुरू होता. (वार्ताहर)
मिरजेत उंबराच्या झाडावर फूल!
By admin | Published: October 09, 2016 12:28 AM