सांगली : तरुणांचा देश म्हणून २०२० पर्यंत आपल्या देशाची ओळख अधोरेखित होणार आहे. त्यामुळे या तरुणांना पूरक ठरणारे व पारंपरिक शिक्षणाला छेद देणारे शिक्षण आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असलेल्या बदलांचा अभ्यास करून कौशल्यावर आधारित शिक्षणाला नवीन शिक्षण पध्दतीच्या अहवालात भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शनिवारी सांगलीत केले.
येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी वर्धापन दिन कार्यक्रमात ‘बदलते शैक्षणिक धोरण’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे होते.
करमळकर म्हणाले की, शासनाच्यावतीने शैक्षणिक धोरणात अमूलाग्र बदल करण्यात येत असून, त्यावरील शिक्षण तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया घेण्यात येत आहेत. यात जे चुकीचे आहे अथवा शिक्षण क्षेत्राला मारक आहे, त्या तरतुदींना विरोध झालाच पाहिजे; पण बदलती आव्हानेही स्वीकारली पाहिजेत. आजवर शैक्षणिक धोरणात बदल झाला असला, तरी पारंपरिक शिक्षणावरच भर देण्यात आला होता, तर बदलही त्याच स्तरावरील होते. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण घेणाऱ्या पिढीच्या अभ्यासास प्राधान्य दिले आहे. नोकरीसाठी फिरण्यापेक्षा स्वत: नोकरी देण्याची क्षमता निर्माण होणार आहे. समाजाच्या गरजेप्रमाणे, औद्योगिकीकरणाच्या उपयोगी शिक्षण आहे का, याचाही अभ्यास यात केला आहे.
यावेळी सागर फडके, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर, डॉ. विश्राम लोमटे, अमित कुलकर्णी, राजकुमार पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते.संशोधनावर भरकरमळकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात त्याच त्या शिक्षणापेक्षा संशोधनावर आधारित शिक्षणावर भर दिला आहे. त्यासाठी विद्यापीठांची स्थापना तीन प्रकारात होणार असून, संशोधनासाठीचे विद्यापीठ, संशोधनाला पूरक शिक्षण देणारे आणि यासाठी शिक्षण देणाºया विद्यापीठांची निर्मिती झाल्यावर देशभरातील संशोधन वाढणार आहे.विलिंग्डन महाविद्यालयातील कार्यक्रमात डॉ. नितीन करमळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. भास्कर ताम्हनकर, अमित कुलकर्णी, सागर फडके उपस्थित होते.