सांगली : मान्सूनची चाहूल लागली असली तरी, अद्याप एकही वळवाचा पाऊस न झाल्याने चिंतेत भरच पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. या चार दिवसात आठ चारा छावण्यांना मंजुरी देण्याबरोबरच लहान जनावरांसाठीही आता सोय करण्यात येणार आहे.दरम्यान, शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता कमीत कमी १५० जनावरांसाठीही चारा छावणी सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय झाला असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीला वळवाच्या पावसाची हजेरी ठरलेली असते. त्यानंतर आठवडाभरातच मान्सूनचे आगमन होते. यंदा मात्र, वळीव पण नाही आणि मान्सूनची चाहूलही नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे.यामुळे जोपर्यंत पाऊस होत नाही, तोपर्यंत चारा-पाण्याची सोय करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी याबाबत निर्णय घेत, आतापर्यंत जिल्ह्यात ५० चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे.यापूर्वी चारा छावण्या सुरू करण्यास संस्था उत्सुक नव्हत्या. मात्र, शासन पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे आता चारा छावणी सुरू करण्यास संस्थांचे प्रस्ताव दाखल होत आहेत. त्यामुळे आटपाडी व जत तालुक्यात आठ ठिकाणी चारा छावण्या मंजूर झाल्या आहेत. आता कमी संख्येच्याही चारा छावण्यांना मंजुरी मिळणार असल्याने छावणीत जनावरांची सोय स्थानिक पातळीवरच होणार आहे.जनावरांच्या संख्येतही शिथिलतेने दिलासायापूर्वी चारा छावण्या सुरू करण्यास कमाल ३००, तर किमान ५०० जनावरे दाखल करण्याचे आदेश होते. शासनाने या अटी शिथिल केल्या असून, आता २५० जनावरांपर्यंत ही अट आणण्यात आली होती. आता १५० जनावरांसाठीही छावण्यांना मंजुरी मिळणार आहे, तर किमान ३ हजार जनावरांपर्यंत एकाच छावणीत सोय करता येणार आहे.
दुष्काळी तालुक्यात १५० जनावरांसाठी चारा छावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:21 PM