ओळी : चिखली (ता. शिराळा) येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. प्रकाश दुकळे मांतेश हिरेमठ उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : आपल्या भाेवतालची स्थानिक बोलीभाषा आणि लोककला जतन करून ठेवणे, ही काळाची गरज आहे. स्थानिक बोलीभाषा टिकली तरच संस्कृती टिकते. संस्कृती टिकली तरच बोली भाषेतील वैविध्यपूर्ण वैभव टिकून राहते. म्हणूनच या गोष्टींचे संवर्धन करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी विभागप्रमुख डॉ. प्रकाश दुकळे म्हणाले, मातृभाषेतून मानवाची उन्नती होते. भाषेमुळेच मानव इतर प्राण्यांपेक्षा प्रगतिशील ठरला. परदेश आणि सीमा भागात मराठी भाषेची अस्मिता अधिक जपली जाते. यावरून मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित होते.
डॉ. मांतेश हिरेमठ म्हणाले, मराठी राजभाषा दिन केवळ एक दिवस साजरा करून चालणार नाही, तर वर्षभर आपण संपूर्ण व्यवहार मराठी भाषेत करून मराठीची अस्मिता जपली पाहिजे.
यावेळी सुमित पाटील, अक्षता येवले, सुजाता पाटील, आशा परीट, डॉ. डी. आर. पाटील, प्रा. शहाजी मस्तूद यांनी काव्यवाचन झाले. कार्यक्रमाला प्रा. सतीश माने, डॉ. रेखा देवकर, प्रा. पी. आर. माळी, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, प्रा. युवराज पाटील, डॉ. गोपीनाथ खानसोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोमल देसाई हिने सूत्रसंचालन केले. प्रियांका साळुंखे हिने आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.