सांगली : शाहिरांच्या लोककलेचा सन्मान म्हणून सांगलीत लवकरच लोककला भवन उभे केले जाईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी मंगळवारी केली. तसेच माईघाटावर ‘एक दिवस शाहिरांचा’ हा कार्यक्रम लवकरच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.अखिल भारतीय शाहीर परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त कोल्हापूर रस्त्यावरील दैवज्ञ भवन येथे मंगळवारी शाहिरांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड बोलत होते. त्यांच्याहस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, स्वातंत्र्यकाळात शाहिरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शाहिरांनी ही लोककला आजही जिवंत ठेवली पाहिजे. लोकप्रबोधनामध्ये शाहिरांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या कलेचा सन्मान केला पाहिजे. यासाठी लवकरच सांगलीत सुसज्ज असे लोककला भवन बांधले जाईल. केवळ एखाद्या कार्यक्रमापुरतेच शाहिरांचे कार्यक्रम ठेवले जातात. पण तसे न करता सांगलीतील कृष्णा नदीकाठी माईघाटावर ‘एक दिवस शाहिरांचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार सुरु आहे. शाहीर संघटनेशी चर्चा करुन लवकरच या कार्यक्रमाची व्यापक अंमलबजावली करण्यात येईल. शाहीर देवानंद माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आदिनाथ विभुते, विनोद ढगे यांच्यासह शाहीर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘जीवनगौरव’ पुरस्कारकार्यक्रमात शिवाप्पा मेंढे व शंकर मेंढे यांचा शाहीर परिषदेच्यावतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सांगलीत लवकरच लोककला भवन
By admin | Published: August 10, 2016 11:44 PM