वाळवा : येथील कोरोना रोखायचा असेल, तर होम आयसोलेशन रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनी नियमांचे कडक पालन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. पंचायत समिती उपसभापती नेताजी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संग्रामसिंह पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, वाळवा वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी, वर्धमान मगदूम, मिलिंद थोरात, आष्टा पोलीस निरीक्षक सिध्द आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, वाळवा येथे विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करावा, त्यासाठी साहाय्य केले जाईल.
उपसभापती नेताजी पाटील म्हणाले, ज्यांना मास्क नाही, त्यांच्या मोटारसायकलचा इथे पाचशे रुपये दंड वसूल करून पुन्हा आष्टा पोलीस ठाण्यात गाड्या का घेऊन जात आहेत. या गाड्या चालकांकडून तिथे पुन्हा पैसे घेतले जात आहेत. ते त्वरित थांबविले पाहिजे.
मिलिंद थोरात यांनी ॲम्ब्युलन्सची मागणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. नायकवडी व डॉ. दौंडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या वाळवा, नवेखेड, जुनेखेड, शिरगाव, अहिरवाडी, पडवळवाडी येथील कोरोनाग्रस्तांची माहिती दिली. राजेंद्र औंधकर, जालिंदर थोरात, जयकर गावडे, धनाजी शिंदे उपस्थित होते.