सांगली : जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून, व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने आणि तयार माल नाकारल्याने कित्येक क्रेट डाळिंब फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यातच डाळिंबावर प्रक्रिया केलेल्या ‘अनारदाना’ची साठवणूक करणाऱ्या दोन शीतगृहांवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु छाप्याच्या कारवाईचा आणि डाळिंब रस्त्यावर फेकून देण्याचा काहीही संबंध नसल्याची भूमिका अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. उलट अयोग्य पध्दतीने ‘अनारदाना’ निर्माण केल्यास यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. ‘लोकमत’मध्ये सोमवारी ‘रोज हजारांवर क्रेट डाळिंब कचऱ्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. यामध्ये अनारदाना करणाऱ्या उद्योगांवर अन्न आणि औषध प्रशासनाने छापे मारून ते उद्योग बंद पाडल्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण असल्याचा उल्लेख होता. याबाबत अन्न आणि औषधच्या प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत कानावर हात ठेवले. छाप्याच्या कारवाईचा आणि डाळिंब व्यावसायिकांवर आलेल्या संकटाचा काहीही संबंध नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मध्यंतरी कुपवाड एमआयडीसीमधील गोमटेश आणि दत्त कोल्ड स्टोअरेज (शीतगृह) या दोन ठिकाणी छापे टाकले होते. तेथे ठेवण्यात आलेला अनारदाना जप्त केला होता. त्यामध्ये शरीराला घातक असणाऱ्या रंगाचा अतिरिक्त वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. जप्त केलेला अनारदाना सांगोला, पंढरपूर येथील शेतकऱ्यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे सांगोला तालुक्यातील ज्या शेतकऱ्याने शीतगृहात ठेवलेला अनारदाना निर्माण केला होता, त्याच्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाईही केली आहे. संबंधित शीतगृहचालकांना नोटीस बजावण्यात आली असून, तपासणीत गैरकारभार आढळला तर शीतगृहाचे परवाने निलंबित करण्यात येणार आहेत. अनारदाना निर्मितीस काहीच हरकत नाही. शेतकऱ्यांनी डाळिंबे रस्त्यावर फेकण्यापेक्षा अनारदाना करण्यासाठी परजिल्ह्यातील प्रक्रिया उद्योगांकडे पाठवावीत. त्यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता त्याची नैसर्गिक स्वरूपातच विक्री केली जाईल, याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)अन्न आणि औषध प्रशासन, सांगली कार्यालयात अनारदानाचे उत्पादन करण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणीकरिता परवाना घेण्यासाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यात अनारदाना प्रक्रिया उद्योग नाही. जे उद्योग आहेत, ते प्रामुख्याने सांगोला, पंढरपूर आदी ठिकाणी आहेत. शेतकऱ्यांनी डाळिंब फेकून देण्यापेक्षा त्यावर योग्य पध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी ती अनारदाना प्रक्रिया उद्योगचालकांकडे पाठवावीत व स्वत:चे आर्थिक नुकसान टाळावे.- डी. एच. कोळी. प्र. सहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, सांगली.
अन्न-औषध प्रशासनाचे कानावर हात!
By admin | Published: January 05, 2015 11:57 PM