सहदेव खोतपुनवत : कणदूर (ता. शिराळा) येथील निवृत्ती ज्ञानू पाटील हे गेली ७७ वर्षे नित्यनेमाने राम नाम लिहीत आहेत. दररोज किमान पाचशे वेळा रामाचे नाम लिहिताना त्यांच्या अनेक वह्या व फायली रामनामाने भरून गेल्या आहेत.कणदूर येथील निवृत्ती ज्ञानू पाटील यांचा जन्म १९४४ चा. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत. वयाच्या बाराव्या वर्षापासून म्हणजेच १९५६ पासून त्यांना रामभक्तीची ओढ लागली. सुंदर हस्ताक्षर असलेल्या निवृत्ती पाटील यांनी तेव्हापासून दररोज राम नाम वहीत लिहायला सुरुवात केली. दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर ते आपली वही उघडून बसतात. वहीचे एक पान भरून रामनाम लिहितात. आतापर्यंत त्यांच्या दहा मोठ्या वह्या व दोन फाईल भरून रामनाम लिहून झाले आहे.कितीही गडबड असली तरीही दररोज सकाळी रामनाम लिहिल्याशिवाय ते कामाला सुरुवात करीत नाहीत. १९६७ साली धनुर्वाताने आजारी असताना दहा दिवस मात्र या उपक्रमात खंड पडला.
पाच वह्या केल्या जलार्पणनिवृत्ती पाटील यांनी गोकर्ण महाबळेश्वर येथे तीर्थक्षेत्रात रामनाम लिहिलेल्या पाच मोठ्या वह्या पाण्यात अर्पण केल्या आहेत. त्यामध्येही भक्तीची भावना असल्याचे पाटील सांगतात. त्यांनी पंढरपूरच्या कैकाडी महाराज मठात एक लाख रामनाम लिहिलेली वही अर्पण केली आहे. सध्या पाटील यांच्या घरी सात मोठ्या वह्या व दोन फाइल आहेत.